Monday, April 30, 2012

असेच.. काहीतरी..पावसाळ्यातच.. काहीतरी लिहिलेले !!

पावसाळा आला की माझे असे होते, मन भरून येते आणि काही तरी लिहावेसे वाटते .. खूप काही लिहावेसे वाटते....

पावसाच्या त्या धारांनी जमिनीवर कोसळताना केलेल्या नाजून आवाजाने .. त्यांनी भिजवून टाकलेल्या त्या मातीच्या सुंदर सुवासाने .. डबकयातल्या त्या बेडकांच्या नादाने ...भर रस्त्यात साचलेल्या पाण्यात .. निरागसपणे खेळणार्‍या आणि ओहळात सोडलेल्या त्या लहानग्या मुलांच्या कागदी होडीने.. मनाच्या कोपर्‍यात एक हलकेसे हास्य फुलते... आणि .............

आणि मग.. सुरू होतो .. प्रवास... विचारांचा........... असाच.. .. नकळत.. .. सुरूच राहतो... दर पावसाळ्यात...
मनातल्या गोष्टी.. मनातले ते विचार.. ते सर्व अगदी न ठरवता .. न सांगता .. न विचार करता .. येत जातात.. आणि बर्‍याच वेळा .. आपण विचार करायला कधी लागलो.. असे आठवत बसतो.. 

दिवसाच्या सुरवातीला काही तरी अश्या घडामोडी घडत असतात ज्यामुळे आपला दिवस .. काल ठरवल्या पेक्षा कसा तरी वेगळा जातो..तसाच आठवडा जातो.. जसेच महीने आणि वर्षेही सरतात.. आणि अगदी .. तसेच आयुष्यही  ..
 
विचार करायला लागल्या क्षणापासूनच आपसूकच काहीतरी जवाबदारी येते.. अगदी छोटी म्हणत म्हणत मोठी होत जाते.
छोट्याश्या गोष्टी खूप महत्वाच्या वाटायला लागतात आणि मोठ्या गोष्टी अगदीच छोट्या .. हे अवघड आहे ...हे  सोपे आहे..हे चांगले आहे .. हे वाईट आहे ..असे आपणच आपल्याला समजावत असतो .. वेळ कसा निघून जातो अगदी लक्षातच येत नाही.
 
विजेच्या तारेवर बसलेल्या पक्ष्याकडे पहिले की असे वाटते, आपण असे हवे होतो. वाटले तर उडावे.. वाटले तर बसावे.. वाटले तिथे जावे.. राहावे.. आणि आकाशाच्या दिशेने भरारी मारत.. गीत गात .. धुंद व्हावे.
 
पावसात भिजत जाणार्‍या दुचाकीच्या मागे बसलेल्या त्या प्रियसी कडे पाहून कधी तिच्या प्रियकराचा सुद्धा कधी कधी हेवा वाटतो.. तर कधी कधी.. त्याच पावसात .. मर्सडिजच्या सीटवर बसून एकटेच जाणार्‍या त्या माणसाचाही... तर कधी.. त्याच पावसात .. आपल्यातच  मग्न असलेल्या त्या लहान मुलांचा हेवा वाटतो......आणि मग अगदी अशाच वेळी..फक्त आपल्याच हातात असणार्‍या  छत्रीकडे पाहून सभोवतालच्या आठ-दहा डोळ्यातला  हेवाही आपलायला दिसतो..
 
मग.. परत विचारचक्र सुरू होते.. आनंद म्हणजे नेमके काय हो ??.. कधी होतो ??.. (आता तो कुणाला होतो आणि कश्या वेळेस होतो यावरही बर्‍याच गोष्टी अवलंबून असतात म्हणा )
 
पण.. मग, मी काही वेगळा आहे का ?.छोट्या छोट्या गोष्टी मला कधी कधी खूप आवडतात तर कधी कधी खूप दुखावतात ..भारतातल्या भ्रष्टाचारापासून ते शेजारच्या गोठ्यातल्या बकरीविषयी  माझी काही तरी मते आहेत.. प्रत्येकाची असतात..मनातल्या अश्या गोष्टी बरेच दिवस मनात राहतात आणि कधी तरी पुन्हा जाग्या होतात..कधी आनंद देतात तर कधी अंतर्मुख करतात.
 
बालपणपून केलेल्या त्या खोड्या आणि खाललेला तो मार आठवतो.. शाळेसमोर त्या पहिल्या दिलेल्या सुविचाराच्या वेळेस लटलाटणारे पाय  आठवतात... शाळा बुडवून रात्री पाहिलेले ते सर्व चित्रपट आठवतात .. प्रेम म्हणजे नेमके काय हे कळत नसतानाही .. .बालपणीच्या निष्पाप आणि निरागस पहिल्या प्रेमाच्या त्या भावना आठवतात.. कॉलेज मध्ये चुकवलेले ते सर्व लेक्चर्स आठवतात...बाहेरच्या हॉटेलमध्ये बसून चहाच्या घेतलेल्या त्या झुरकया आठवतात.. इंटरव्ह्युसाठीच्या एस्त्री केलेल्या त्या शुभ्र शर्टावर उडलेले ते शिंतोडे आठवतात.. ऑफिसला खोटे कारण सांगून पावसात सर केलेले ते गड आठवतात.. मित्रांसाठी आणि त्यांच्या लग्नासाठी केलेले ते प्रवास आठवतात... दूर शहरातून घरी पोहोचण्यासाठीचे ते शर्थीचे प्रयत्न आठवतात.. जुन्या गोष्टी आठवून भर पावसात गाळलेले ते अश्रु ही आठवतात.. हळुवार सुरू होवून आक्राळ विक्राळ होणार्‍या अश्या त्या पावसातल्या सार्‍या आठवणी आजही अगदी कालसारख्या स्वच्छ आठवतात..
 
श्रावणधारांच्या ह्या मोसमात काय जादू असेल ती असेल... मन माझे हे वेड्यागत विचारांच्या चक्राला अजून गती देत सुटते.. आणि आजवर अनुभवलेल्या त्या प्रत्येक पावसाच्या आठवणींचे गाठोडे अगदी अलगद उलगडत जाते .. मग.. अश्याच आठवणींच्या पसार्‍यात मी हरवत जातो.. अगदी नेहमी... दर पावसाळ्यात ...

खरच .. पावसाळा आला की माझे असे होते, मन अगदी भरून येते आणि काही तरी लिहावेसे वाटते .. खरच .. खूप काही लिहावेसे वाटते..