Wednesday, December 4, 2013

असेच कुणीतरी असावे !!


काळोखाच्या गर्द जाळ्यातून
जसे प्रकाशाने यावे
दुर्गम अससेल्या वाटेतूनही
मग सोपे मार्ग दिसावे

अश्रुंच्या त्या धारानीही
तिथेच असे थांबावे
दुखः सर्व विसरून
ओठी हसू उमटावे

भरकटलेल्या त्या मनानेही
स्तब्ध उभे रहावे
आलेल्या त्या वर्षावात
चिंब असे भिजावे

वा-याच्या त्या झुळूकेवर
जसे फुलांनी डोलावे
पैंजणाच्या तिच्या तालावर
स्वर तसे घुमावे

डोळे थोडे तिरपे करून
आपण तिला पाहावे
असे काही क्षण
अनंतकाळ टिकावे

नाजुकश्या तिच्या स्पर्शाने
लाजळूनेही मग लाजावे
हृदयातल्या त्या भावनांनी
हळूच ओठावर यावे

कुठल्याश्या विनोदावर दोघांनी
अगदी मनसोक्त हसावे
हरवून भान सगळे
स्वतःलाच मग विसरावे

अश्या मधुर नात्यात
कधी दुरावे नसावे
आयुष्याच्या ह्या प्रवासात
असेच कुणीतरी असावे !!
------------------------------------------------

श्रीनिवास

Saturday, June 22, 2013

प्रेम हे नक्की काय असते ? ..



Love


कधी कधी मनात असलेल्या विचारांना वाट करून द्यायची असेल तर ते कागदावर उतरवावे. मन मोकळे होते. पण आजकाल, झाडे कमी होत चालली आहेत. म्हणून ते ऑनलाइन उतरवले तरी चालेल. कागद, निसर्ग पण सुरक्षित आणि आपण पण खुशीत.

आता मूळ मुद्द्यावर येवूया. खरे तर, काही मूळ मुद्दा नाहीये इथे. मुद्दामच काही तरी लिहायला घेतले आहे. बरेच दिवस झाले, मनातल्या भावना ऑनलाइन मोकळ्या केल्या नव्हत्या ;)
असो, आता काही लिहायचे म्हंटले तर विषय हा लागणारच. नाही तर कोण वाचणार आणि कशासाठी ?
उगाच काही तरी लिहूनही अर्थ नाही. मग ? .. ठीक आहे.. चला, काही तरी नेहमीचेच बोलूयात/ लिहुयात.
प्रेम ! प्रेम हा सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय. काही लोकांच्या मते, प्रेम म्हणजेच जिव्हाळा.
आता “प्रेम” म्हणजे नेमके काय हो ? खरच .. मला तरी नक्की नाही माहिती ह्या so called “जादुई” शब्दाचा अर्थ.
“आयुष्य जर सार्थक करायचे असेल तर एक तर तुम्ही कुठल्याश्या देवस्थानाला तरी भेट द्यायला हवी किंवा कुणावर तरी प्रेम करायला हवे.” असे पुसटसे कुठे तरी वाचल्यासारखे आठवते ( कदाचित मीच लिहिले असेल कधी तरी.. कुठे तरी..पण असो :P )

आपल्याला कळायला लागल्यापासून कुणी न कुणी आपल्या परिचयाचे ह्या विचित्र आजाराने त्रस्त झालेले आपण पाहिले असेल (येथे आजार = प्रेम अशी उपमा देवून मी जरा कलात्मक असण्याचा/दिसण्याचा मिष्किलसा प्रयत्न केला आहे.)

थोड्या वेळापूर्वी “प्रेम हे नक्की काय असते हे स्वतच समजवून घेण्याचा मी प्रयत्न केला.
मग, मला हे प्रश्न पडलेत,  कुणाला तरी आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनवण्यासाठीची अनामिक उत्कटता म्हणजेच प्रेम का ? .. आपल्या एकलकोंडेपणाला लपवण्यासाठी कुणाला तरी मिळवण्याची निष्पाप धडपड म्हणजे प्रेम का? .. कुणाला अचानक बघून अंगावर आलेला शहारा म्हणजे प्रेम का ( हसू नये !) ?.. का समोरच्या सुंदर (सुंदरता हा मोठा अवघड शब्द आहे. तुम्हाला सुंदर वाटणारी गोष्ट दुसर्‍याला सुंदर वाटेलच असे नाही.. बर.. सोडा ते..) व्यक्तिला बघून नकळत आलेले मनातील निरागस विचार ? .. की कुणाला तरी झाले म्हणून मलाही होते आहे असे वाटणारी मनाची फसवी समजूत म्हणजे प्रेम ?

“पाणी” म्हंटले की आपल्या डोळ्यासमोर पाणी म्हणजे काय याची एक पुसटशी आकृती तरी येते ( कुणाला समुद्र सुचतो, कुणाला नदी, कुणाला पाऊस तर कुणाला बिसलेरीची बाटली) पण, पाणी आपण बघू शकतो, अनुभवू शकतो.

भावनांचे तसे नसते. हे सगळे आपल्या मनाचेच खेळ. ( तसे
, मन असते हा पण एक अंनूतरित प्रश्न आहे.. पण आज नको). भावना ह्या फक्त अनुभवायच्याच असतात.
प्रेम ही सुद्धा एक अशीच भावना आहे हे तरी नक्की. आता तिची अनुभूति कधी, कुणाला आणि कशी होईल हे सांगणे अवघड आहे. पण प्रेम हे असते ह्याची जाणीव म्हणजे जीवंत असल्याची अनुभूति.

म्हणून, “प्रेम काय असते” ह्या प्रश्नाचे उत्तर कदाचित “एक अशी गोष्ट जी तुम्हाला तुम्ही सजीव असल्याची जाणीव करून देते, आणि समोरच्या सजीव व्यक्तिला देखील तुम्ही खरच सजीव आहात याची प्रचिती पटवून देते” असे असेल.

नाही माहीत.. आता अश्याच विचारांच्या जाळ्यात अजून गुरफटत बसून, तुमचा जास्त वेळ घेण्यातही मजा नाही.
उत्तर मी शोधत राहील..कदाचित सापडेल .. कदाचित नाही .. बघूया.. कळवत राहीन !

तुम्हाला सापडले तर जरूर कळवा...

मी थांबतो आता.. पुन्हा भेट होईलच.. “प्रेमाने” भेटा म्हजे झाले J