Monday, April 30, 2012

मी आणि माझी मराठी



----------------------------------------------
महत्वाची नोंद :
सादर केलेले विचार हे माझे व्ययक्तिक असून त्यांच्याशी प्रत्येक व्यक्ति सहमत असेलच असे नाही.  हे सर्व लिहिण्यामागे प्रांतवादाचा किंवा भाषिक वैर तयार करणे हा हेतु नसून, आपल्या महाराष्ट्रात आपल्याच माय मराठीच्या मी पाहिलेल्या व अनुभवलेल्या सद्यस्थिती वरचे विचार मांडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. यातून चुकून-माकून कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगीर आहे.
-----------------------------------------------

मागच्याच वर्षी.. चेन्नईला नवीन जॉब (नोकरी ) मिळाली. आता जाणे भागच होते.  कामानिमित्त काही गोष्टींचा त्याग करावाच लागणार होता. मुंबई नावच्या कॉस्मोपोलिटन (मराठीत काय म्हणता नाही माहीत ) शहरात राहिल्यानंतर आता चेन्नई नावच्या नवख्या भागात जावे लागणार होते. सुदैवाने एक मित्र होता तिथे,त्यामुळे थोडे बरे होते. त्याला विचारले.. "बाबारे.. काय म्हणते चेन्नई... कसे आहे ?.. मुख्य अडचण कसली येईल ?.."
"जेवण आणि भाषा.." त्याचे हे उत्तर फारच लहान वाटले... म्हंटले.. ठीक आहे.. भागून जाईल.

मग काय...केली मनाची तयारी आणि आलो चेन्नईला.
मात्र राहायला गेल्यापासून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवायला लागली.
आल्यानंतर जेवणाची फारशी अडचण नाही झाली. लहानपणापासून बाहेरगावी राहण्याची सवय असल्याने जेवण हा मुख्य मुद्दा नव्हता. मुख्य अडचण होती ती भाषा..
(कृपया लक्षात घ्या मला अडचण म्हणायचे आहे. त्रास नाही ... अडचण ही आपल्यात असलेल्या उनिवेमुळे स्वतःलाच तयार होणारा त्रास हा असा माझा येथे संदर्भ आहे. )

पोहोचलो आणि लगेचच झाली पंचाईत.. अगदी उतरल्याक्षणापासून .. मित्राच्या घरी कसे जायचे ?” उतरल्यावर हा तर सर्वात आधी तयार झालेला मोठा प्रश्न होता.त्याला संपर्क केला. परंतु, भ्रमणध्वनी असल्यामुळे तशी चांगली सोय झाली, मित्रास संपर्क केला आणि रिक्षावाल्याच्या हातात भ्रमणध्वनी सोपवला. रिक्षावाला आणि मित्र दोघेही एकमेकाला तामिळ भाषेत काहीतरी समजून देण्याचा आणि घेण्याचा प्रयत्न करू लागले.. मी ही समजावून घेण्याची सुरवात केली आणि लगेचच लक्षात आले, हे कुरन आपले नव्हे.
कसातरी पोहोचलो आणि त्या दिवसापासून..आजतागायत अनेक अनुभव आलेत. अनेक वेळा पेच तयार झालेत. मात्र तिकडे मित्रपरिवार अत्यंत मदत करणारा आणि समजावून घेणारा मिळाला. सर्वच गोष्टीत मदत झाली. सांगायचे तात्पर्य .. यात जर दोष कुणाचा असेल तर माझाच.. कारण मला ती भाषा येत नाही.  चेन्नईला येवून जर आपण इंग्रजी किंवा हिन्दी मध्ये बोलालत तर आपणास जे विचारले त्याचेच उत्तर मिळेल. मात्र आपण तामिळ मध्ये बोलून किंवा बोलण्याचा प्रयत्नतरी करून पहा, समोरचा तुम्हाला आपुलकीने दहा चांगल्या गोष्टी सांगेल.
हे सर्वच ठिकाणी आहे.(महाराष्ट्रात तुलनेने खूपच कमी ) त्याचमुळे माझेही तामिळ भाषा शिकण्याचे प्रयत्न चालू आहेत आणि मित्रांच्या कृपेने त्यात जुजबी यशही आहे.  ते असो..

आता मला जवळपास आता एक वर्ष झाले आणि ह्या दरम्यान दुसर्‍यांदा घरी आलो.. पहिली चक्कर ही खूपच छोटी होती आणि म्हणून जास्त वेळही नाही मिळाला असा विचार करायला. ह्या खेपेस मात्र जवळपास दोन आठवडे घरी होतो.. थोडाफार प्रवासही झाला.. निरनिराळी लोकेही भेटली..बोललीत आणि विचारांचा एकाच चिवडा तयार झाला... आता त्याच विचारांच्या चिवड्याचे पुडके सोडतोय ...

चेंनाईहून परत आल्यावर आतापर्यंत भेटणार्‍या बर्‍याच लोकांनी मलाच सहानभूती दिली.. बरीच लोके म्हणलीत खरच हो.. खूप अवघड आहे तिथली लोके..हिन्दी आणि ईग्रजी बोलायला टाळाटाळ करतात .. त्यांचीच भाषा रेटतात
मलाही सुरवातीला ते तसेच वाटायचे... पण अलीकडे काही वेळा... सहजिकपणे आपल्या महराष्ट्रात आल्यावर मराठी बोलत असताना मला इंग्रजी घ्यायला लागणारा आधारही बराच वाढायला लागला (काही लोकांना ते खूप चांगले वाटते...आणि काही तर ते मुद्दामही करतात ..तर काहींना असे केल्यावर उगाच आव आणून भाव खातो आहे असेही वाटते.) पण मग तेव्हा, थोडावेळ मिळाला की मीच स्वतःला विचारायला लागलो. अस्सल मराठी म्हणवून घेण्याची आपली पात्रता आहे का ? मराठीचा नक्की आपल्याला गर्व असायला हवा की मराठी असून मराठी येत नसल्याची लाज ?? की हा सगळं एक टोकाचा प्रांतवाद आहे ??” अश्याच विषयातून तयार झालेल्या माझ्या ह्या भावना मी जमेल तितक्या थोडक्या स्वरुपात मांडण्याचा प्रयास केला आहे.

मुंबईला राहून एक गोष्ट मी खूप अनुभवली. ती म्हणजे मराठी लोके न ओळखता येणे (निदान मलातरी ). महाराष्ट्राच्या ह्या राजधानीला संपूर्ण देश, आर्थिक राजधानी म्हणवतो. सर्व धर्म आणि प्रांतांचे लोके तिथे आलेत आणि कालांतराने मराठी ही लुप्तच होत गेली. हिन्दी भाषिक लोके आलीत आणि मराठी माणूस कौतुकाने आपण किती लवकर हिन्दी शिकू शकतो ह्या स्पर्धेतच हरवला. स्वतची भाषाच विसरला. तिथे स्थायिक होणार्‍या प्रत्येक परप्रांतीयांकडून त्यांची भाषा शिकला आणि मराठीचे अस्तित्व गमावून बसला. मुंबईत राहणार्‍या माझ्या अनेक परप्रांतीय मित्रांना त्यांच्या मातृभाषेचा जाज्वल्य अभिमान असल्याचे आणि स्वकीय मराठी लोकांना फ्याड ईंग्रजीचे असलेले खूळही मी पहिले आहे. मराठी घरातल्या व्यक्तीने समाजाने आपलेसे करावे म्हणून मराठीचा त्याग करून दुसर्‍या भाषांचे गायलेले गोडवेही पाहाला मिळतात. माझे हे सांगण्याचा फक्त मराठीच शिका आणि इंग्रजी / हिन्दीचा त्याग करा असा याचा अर्थ बिलकुल नव्हे. तसे ध्वनित होत असेल तर माझ्या शब्दांच्या मांडणीला माफ करा.

याबद्दल कुठेही दुमत नाही की इंग्रजी आणि हिन्दी ह्या अत्यंत महत्वाच्या भाषा आहेत. कारण... कारण ..आज त्या बर्‍याच ठिकाणच्या स्थानिक भाषा बनल्या आहेत. जेथे आपण गेलो तर आपल्याशी कुणी मराठीत बोलणार नाहीत. साहजिकच आहे, अश्या गोष्टी कुणावर लादायच्या नसतात, त्यांची सवय,ओळख आणि जडणघडण लहानपणापासून होणार्‍या संस्कारातूनच होत असते. आपणही दुसर्‍या भाषा शिकले पाहिजे, व्यक्तिमत्वाचा आणि प्रतिभेचा विकास होण्यास हे खूप मदतशीर ठरते. पण हे सर्व करत असताना आपण आपल्या मराठीभाषेचा उपहास का करायचा ? मराठी वाङ्मय इतके समृध्द असताना आपण त्याची उपेक्षा का म्हणून करायची ?.
आजकालच्या लहान मुलांना Twinkle twinkle little star गीत म्हणता आल्यावर आपण कौतुकाने त्यांच्याकडे पाहतो मग त्याचवेळी चंदा मामा चंदा मामा ये रे ये असे गाणार्‍या बच्चेकंपनीकडे दुर्लक्ष का ?

स्वातंत्र्यकाळानंतर ईंग्रजांनी चेन्नई आणि मुंबई एकाच वेळेस सोडले असेल. पण, आज मुंबईला आणि चेन्नईला येणारा जो कुणी ईंग्रज येतो, त्यालाही  मुंबई ही जणू त्यांच्याच गावाकडची वाटु लागते. मराठी माणूस मग अश्यावेळी सुखावतो. "आपण बरीच प्रगती केली" असे काहीतरी स्वतचे गैरसमज करून नमस्कारा एवजी आपले हात शेकहँड साठी पुढे होतात. "Hi.. Hello.. How do you do ?" असे आपण म्हणायला लागतो. चेन्नईला मात्र तसे झालेले दिसत नाही.. स्थानिक लोकांनी त्यांच्या भाषेचा अत्यंत आदर केला आणि येणार्‍या प्रत्येक परप्रांतीयसाही करायला लावला. अन्यथा त्यास जास्त आपलेसे केले नाही. पण भाषा शिका आणि मगच येथे रहा अशी माजोरीही केली नाही. लोक सर्वच चांगली आणि समजूतदार असतात. परिस्थिती लोकांचे स्वभाव बदलवण्यात मोठी भूमिका बजावते. तिथल्या परप्रांतीयांनीही परिस्थिती ओळखून तिकडची भाषा आत्मसात केली आणि आज गुण्यागोविंदाने तिकडे ती लोके नांदत आहेत. आता रजनीकांतचेच उदाहरण घ्या ना. मुळाचा मराठी असललेला तिथे जाऊन इतके सुंदर मिसळला की आता लोके त्याच्या पूर्णाकृती पुतळ्याचे दुग्धभिषेक करतात. आपल्याला महाराष्ट्रात मात्र हे जमलेच नाही. येणार्‍या प्रत्येकासाठी आपणच आपली भाषा सोडली असे वाटायला लागते.

"प्रत्येक देशाच्या प्रगतीसाठी त्यादेशात एक भाषा ही राष्ट्रभाषा असते. सर्व देशवासिय ती भाषा बोलतात आणि देशांतर्गत होणार्‍या सर्व आर्थिक,व्यावसायिक आणि प्रसंगी दैनंदीन व्यवहारात तिचा उपयोग होतो आणि अश्यातूनच देशाची प्रगती होते." हे असे किंवा अश्याच आशयाचे काहीतरी आम्ही इतिहासात शिकलो.
आपल्या हिंदुस्थांनाची देशभाषा ही "हिन्दी" झाली आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने जणू हिंदवी स्वराज्याच्या सोबतच हिन्दी राज्याच्या स्थापनेची शपथ घेतली असे वाटायला लागले.

"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी" आणि "अमृताशी देखील पैंजा जिंकणारी ती मराठी" असे आपणच म्हणायचो का असा प्रश्न आता मला पडायला लागला. मुंबईमध्ये असलेल्या मराठी माणसाला समोर इंग्रजी बोलणार्‍या मुलामुलींना पाहून लाजायला का होते ? चेन्नईमध्ये असे लाजणारा मनुष्य मी तरी नाही बघितला. इंग्रजी किंवा हिन्दी बोलायला माझा विरोध बिलकुल नाही. पण मराठी बोलायला का लाज ??.. कित्येत ठिकाणी मराठीमध्ये बोलायला दोन मराठी माणसे आता चारवेळा विचार करायला लागल्यासारखे आहेत असे जाणवते. महाराष्ट्रात मराठी नाही तर काय बोलणार तुम्ही ? आता कृपया ह्यास हा प्रांतवाद आहे असे म्हणू नका. ज्या परमप्रतापी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शोर्यगाथा एकताना आमच्या लहानपनीही अंगावर काटे यायचेत , आता राजांच्या त्याच महाराष्ट्रात मराठीची ही केविलवाणी अवस्था पाहिल्यावर मोठेपणीही अंगावर काटे आल्याशिवाय राहत नाहीत.

उदाहरणादाखल सॉफ्टवेअर इंडस्ट्री मध्ये बरीच सॉफ्टवेअर ही आता आपल्या स्थानिक भाषेत रूपांतरित  होत आहेत. कुठलेही असे नवीन सॉफ्टवेअर उचला आणि पहा..तुम्हाला "तामिळ" भाषा ही दिसलीच पाहिजे. एकवेळ हिंदीहि नसेल पण तामिळ असेल. अर्थात 'तामिळ' भाषा तिथे असणे हे गैर नाही .. बिलकुल नाही.. उलट गर्वाचीच गोष्ट आहे. पण मग 'मराठी' तिथे का नसावी ? आता मराठी लोके सॉफ्टवेअर इंडस्ट्री मध्ये कमी आहेत असा नका सांगू.. पुराव्यानिशी सादर करता येणार नाही हा दावा J

आधी तरी म्हणता यायचे पुण्यात जा आणि पहा .. मराठी थोडीफार लाज सांभाळून होती ती त्या पुण्यात. पण आता विद्येचे माहेरघर म्हणता म्हणता सर्व कॉलेजेस आलीत आणि साहजिकच परप्रांतीयही तेथे गोळा होवू लागलेत. मग आपल्याकडची माणसे म्हयालया मोकळी झालीत की ह्याच मुळे मराठी कमी झाली ..अरेपण आता हीच गत चेन्नईची का नाही झाली ? तिथेही आहेतच की सर्व चांगली कॉलेज आणि विद्यापीठे ?

फरक सोपा आहे. तिथली स्थानिक लोके त्यांच्या संस्कारांना जपून आहेत आणि येणार्‍या पिढ्या दर पिढ्या ते पाळत आहेत. त्यांच्या अभ्यासक्रमाततर हिन्दी हा विषय देखील नाही.( ह्याला माझे समर्थन बिलकुल नाही ). त्यांच्या प्रदेशात येणार्‍या-जाणार्‍या प्रत्येकाला त्यांच्याशी संवाद साधायला जरी अडचण होत असेल तरी चालेल पण "आपण आपली भाषा टाकून त्या व्यक्तीच्या भाषेत तोडके मोडके संवाद साधायचे नाहीत" हे सोपे ब्रीद ती लोके पाळतात. त्यात गैर काहीच नाही. कारण अश्यावेळी समोरच्यालाही कळत नाही की तुम्हाला काय म्हणायचे आहे. ( इथे समजून घ्या की असला हा प्रकार "गरज समोरच्याला आहे म्हणून आपण शिष्ट व्हावे" अश्यातला नाही.)  हा सवयीचा भाग आहे. तुम्ही ज्या भारतात राहतात त्यात जरी हिन्दी राष्ट्रभाषा असली तरी जन्मल्यापासून आपण जिथे लहानाचे मोठे झालो त्याच मातीतली भाषा तुम्हाला येणे स्वाभाविक आहे. म्हणूनच, प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हिंदीच बोलावे असा भारतात नियम नाही.  अश्यावेळी तुमच्या स्थानिक संस्कृतीचे आणि भाषेचे तुम्ही जतन का करू नये ? आता, जर तुम्हाला अमेरिकेला जायचे असेल तर तुम्ही झक मारून इंग्रजी शिकणार पण मग तामिळनाडू मध्ये येताना तामिळ शिकायला काय अडचण आहे ? असा साहजिक प्रश्न येथे तयार होतो. जर आपण लहानअसल्यापासून मराठी बोलत आलो आहोत तर मोठेपणी कुणा दुसर्‍याला सुखावण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनाच्या भाषेचा त्याग का करावा ? इंग्रजी आणि हिन्दी शिकाच आणि त्याच बरोबर मराठीलाही मनाचे स्थान द्या. "माझी मुले मराठी शाळेत शिकतात" असे कुणी म्हंटले तर त्याकडे केविलवाण्या दृष्टीने आज आपलाच मराठी समाज का पाहतो ??  मराठीचा स्वाभिमान आपण एतक्या लवकर का टाकून देतो ? मुलाला इंग्रजी किती सुंदर बोलता येते हे सांगणारी पालक मंडळी मी लहानपणापासून पाहत आलोय. पण मराठीत प्रथम आला म्हणून कौतुक करणारी आई-वडील काही मला दिसली नाहीत. असे का ?

आता हे सर्व मीच प्रथम म्हणतो आहे असे नाही. आचार्य बर्वे यापासून ते राज ठाकरे सुध्हा तेच सांगत आहेत. आता ह्या माझ्या बोलण्यामागे काही राजकीय हेतु नाही आणि कुणा पक्षाची तरफदारीही करण्याचा इरादा नाही. हा केवळ एक प्रयत्न आहे तो माझे विचार मांडण्याचा. आपण एकलेल्या आणि सांगितलेल्या गोष्टी विसरतो.  आपणच काय..अगदी सर्वच लोके विसरतात. म्हणूनचतर ... पुन्हा पुन्हा त्याच कथा घेवून नवीन नवीन सिनेमे तयार होतात आणि यशस्वी ही होतात J

आज पन्नास वर्षांनंतरही "जय महाराष्ट्र असे मराठीत म्हणताना माझ्या मुलाबाळांच्या माना गर्वाने उंच राहव्यात हाच प्रामाणिक हेतु आहे .आपण येणार्‍या पिढीला मराठीभाषेचे आणि आपल्या संस्कृतीचे महत्व पटवून देवूयात. मराठीच्या होणार्‍या ह्याअवहेलनेला थांबवूयात. पुन्हा आज "मराठा तितुका मेळवावा .. महाराष्ट्र धर्म वाढवावा" ह्या शब्दांचे महत्व जाणून घेवून कृतीस सज्ज होवूयात.

ह्या नवीन वर्षानिमित्तही (ख्रिस्ती नववर्षानिमित्त) नेहमीप्रमाणे आपणही काहीबाही संकल्प सोडणार आणि ते ही अर्ध्यात सोडणार... आता ह्यावेळी जरा निराळा संकल्प सोडूयात... "मराठी न सोडण्याचा"... आणि हा संकल्प अवघे आयुष्य निभावूयात ....काय म्हणता ??

बर्‍याच दिवसांनंतर मला आज न राहवून मी हे लिहायायला घेतले आहे. माझ्या ह्या लिहिण्यामुळे एका जरी मराठी बांधवाने ह्या विचारामुळे मराठीचा सन्मान करायचा ठरवलं तरी हे माझे प्रयत्न सार्थी लागलेत असे वाटेल.

जय महाराष्ट्र .. जय मराठी !!

आपलाच : श्रीनिवास पाटील

( टीप: शक्यतितक्या ठिकाणी मराठी शब्द मांडण्याचा हा प्रयत्न होता. काही राहिले असल्यास व चुकले असल्यास आपलाच समजून माफी असावी. )

No comments:

Post a Comment